ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणातील कथित मध्यस्थ ख्रिश्चियन मिशेलने चौकशीदरम्यान सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नावं घेतल्याचा दावा ईडीने केला आहे.या दाव्यामुळे राफेल घोटाळ्यावरून भाजपवर चिखलफेक करणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधीच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत .
ईडीने केलेल्या दाव्यानुसार मिशेलने
राहुल आणि सोनियांच्या नावाचा उल्लेख केला आहे. मात्र नेमकं कोणत्या प्रकरणात आणि
कोणत्या कारणासाठी त्याने या नावांचा उल्लेख केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
याशिवाय ईडीचा दावा आहे की मिशेल ने ‘इटलीच्या महिलेचा मुलगा’ असाही उल्लेख केला
आहे.ख्रिश्चियन मिशेलची रवानगी 7
दिवसांच्या ईडी कोठडीत करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने शनिवारी
पटियाला हाऊस कोर्टात केलेल्या या दाव्याने एकच खळबळ उडाली.
काय आहे ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळा
भारतीय हवाई दलाने २०१० मध्ये इटलीच्या
ऑगस्टा या कंपनीकडून ३ हजार ६०० कोटी रुपयात १२ व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीचा
करार केला होता. ज्यावेळी हा व्यवहार झाला, त्यावेळी
केंद्रात कॉंग्रेसचे मनमोहन सिंह यांच्या नेतृत्त्वातील यूपीए सरकार होते.
त्यावेळी हवाई दलाचे प्रमुख एस पी त्यागी होते.
या व्यवहारासाठी ऑगस्टा या कंपनीकडून कमीशनरुपी
१० टक्के म्हणजे सुमारे ३५० कोटी रुपये लाच म्हणून देण्यात आली होती. २०१२ मध्ये
हा घोटाळा समोर आला. २०१३ मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी या
व्यवहारारात भ्रष्टाचार झाल्याचे कबूल करत, हा
हेलिकॉप्टर खरेदीचा करारच रद्द केला होता.
भारताने हा व्यवहार ‘ऑगस्टा वेस्टलँड’
या कंपनीसोबत केला होता. इटलीच्या ‘फिनमेक्कनिका’ कंपनीने १२ ऑगस्टा वेस्टलँड
हेलिकॉप्टरच्या सौद्यापोटी माजी वायूसेना प्रमुख एस पी त्यागी यांच्यासह त्यांच्या
तीन नातेवाईंकाना लाच दिल्याचा आरोप आहे.ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरने टेंडर
मिळावं यासाठी अटी-शर्ती शिथील केल्याचाही आरोप आहे. त्यामुळेच या कंपनीला हे
टेंडर मिळाल्याचं सांगण्यात येतंय.
कोण आहे ख्रिश्चियन मिशेल
या प्रकरणात मिशेलने 225 कोटींची कमीशनरुपी लाच घेतल्याचा आरोप
आहे. मुख्य आरोपी आणि ब्रिटीश नागरिक असलेल्या ख्रिश्चियन मिशेलला 5 डिसेंबर 2018 रोजी दुबईतून भारतात आणण्यात आलं.
त्याचीच सध्या कसून चौकशी सुरु आहे.